Coronavirus : चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 4787 नवे पॉझिटिव्ह तर 40 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा कोरोनाने उचल खाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून चिंतेचे वातावरण आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार, आज (बुधवार) राज्यात 4 हजार 787 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 51 हजार 631 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.49 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 3 हजार 583 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 19 लाख 85 हजार 261 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.62 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढीबरोबर मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

सध्या राज्यात 38 हजार 013 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 54 लाख 35 हजार 268 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 20 लाख 76 हजार 093 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.43 टक्के इतके आहे. सध्या 1 लाख 95 हजार 704 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 1 हजार 664 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.