Coronavirus : दिलासादायक ! राज्यात फक्त 2 दिवसांत 700 ‘कोरोना’बाधित झाले बरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये 700 पेक्षा अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याची संख्येत वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात 9 मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर 25 मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर दररोज राज्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी 4 मे रोजी पहिल्यांदाच 350 रुग्णांना तर लगेच दुसऱ्या दिवशी 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.

उपचारानंतर सोमवारी आणि मंगळवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या यापूर्वीपेक्षा अधिक आहे. सलग दोन दिवसांत रुग्ण बरे होत असल्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच सव्वा महिन्यात सुमारे 2 हजार 819 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. त्यांनी असंही नमूद केलं की, गेल्या दोन दिवसात राज्यात सर्वाधिक मुंबईतील 460 रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यापाठोपाठ पुणे मंडळातील 213 रुग्णांना बरं करून घरी पाठवण्यात आलं.