Coronavirus : ‘ते 2 जण महाराष्ट्रातून आलेत’ ! माहिती देणार्‍या युवकाची बिहारमध्ये हत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम –  महाराष्ट्रामधून आलेल्या दोन जणांची माहिती कोरोना मदत केंद्राला देणार्‍या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे.

सीतामढीमधील मधौल गावातील एका कुटुंबातील दोनजण महाराष्ट्रामधून परत आले. या दोघांची माहिती गावात राहणार्‍या बबलू कुमार या तरुणाने कोरोना मदतकेंद्राला कळवली. त्यामुळेच गावामध्ये दाखल झालेले दोघेही नाराज झाले. कोरोना मदतकेंद्रामधून फोन आल्याने या दोघे आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना चाचणीचे सॅम्पल देऊन आले. त्यानंतर या दोघांनी आपल्या कुटुंबातील पाच जणांना सोबत घेऊन बबलूला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये बबूलीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस गावामध्ये पोहचले. त्यांनी हत्येचा आरोपाखाली या सात जणांना अटक केली आहे. या सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. गावकर्‍यांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. बिहार सरकारने गावांमध्ये परराज्यामधून परत आलेल्या स्थानिकांची माहिती करोना मदतकेंद्राला देणे बंधनकारक केले आहे.