कोरोनाबाबत धक्कादायक खुलासा ! भारतातील ‘या’ वयाचे लोक संसर्गाला जास्त प्रमाणात बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना व्हायरस संक्रमणामुळे पीडित लोकांमध्ये एक वेगळा ट्रेंड समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युरोप आणि संपूर्ण जगाशिवाय केवळ भारतात वृद्धच नव्हे तर मध्यमवयीन आणि तरुण लोकही संसर्गाने पीडित आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या मते, भारतात शून्य ते २० वर्षांपर्यंतची ९ टक्के प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचप्रमाणे २० ते ४० वयोगटातील ४२ टक्के, ४० ते ६० वर्षे वयोगटातील ३३ टक्के आणि त्यापेक्षा जास्त वयाची नोंद असलेल्या रुग्णांची संख्या १७ टक्के आहे.

आतापर्यंत भारतातील संसर्गाच्या सर्व प्रकरणांपैकी ५८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने म्हटले की, सरकार प्रत्येक स्तरावर लॉजिस्टिक पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच तबलीगी जमात संबंधित संसर्ग प्रकरणांबाबत गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव म्हणाले की, तबलीगी जमातशी संबंधित २२००० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी एक हजार २३ जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे.

लव अग्रवाल म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. आपल्या चेहऱ्याचा मास्क कुटुंबातील इतर कोणाशीही शेअर करू नका. तसेच आतापर्यंत ७५००० लोकांची चाचणी घेण्यात आल्याचे समजते. चाचणीच्या प्रक्रियांत सतत वाढ होत आहे. पूर्वी आम्ही दररोज ५००० नमुन्यांची चाचणी घेऊ शकत होतो, आता आमची सर्व लॅब रोज १०,००० चाचण्या घेत आहेत. आम्ही काही देशांकडून लॉजिस्टिक्ससाठी समन्वय साधत आहोत, आम्ही कोट्यावधींचे ऑर्डरही जारी केले आहेत आणि आता वस्तूही पोहोचू लागल्या आहेत.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे आज आरोग्य मंत्रालयाने निर्णय घेतला की, कोरोना संसर्गाचे रुग्णही पंतप्रधान आयुष्मान योजनेच्या कक्षेत येतील. आयुष्मान योजनेंतर्गत ५० कोटी लोकांचे आरोग्य कार्ड बनविण्यात आले आहे, त्यामुळे त्याचा फायदा कोरोना संसर्गग्रस्त रूग्णांना होईल जेणेकरून या योजनेंतर्गत खासगी रुग्णालयातही उपचार घेता येणार आहे.