Lockdown : 3 मे नंतर दिल्ली-मुंबई सारखी मोठी शहरं ‘रेड’ झोनमध्येच राहणार, आरोग्य मंत्रालयानं तयार केले नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीचे संकट जसजसे वाढत जाईल तसे सरकार आपल्या धोरणात बदल करत आहे. प्रत्येक जिल्हा व राज्याच्या सद्यस्थितीनुसार पुढील धोरण तयार केले जात आहे. आता आरोग्य मंत्रालयाकडून ३ मेनंतर जिल्ह्यांना स्वतंत्रपणे विभाजन करण्याचे काम केले गेले आहे. देशात अजूनही जिल्हे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागले गेले आहेत, परंतु यावेळी त्यात थोडे बदल करण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाकडून प्रकरणांची संख्या, दुप्पट दर आणि चाचणीनुसार जिल्ह्यांची नवीन यादी तयार केली आहे. कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे आणि कडक कारवाई कशी होईल, हे यात सांगण्यात आले आहे.

नवीन नियमांनुसार, आता एखाद्या जिल्ह्यात २१ दिवस कोरोना विषाणूचे कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नाही तर तो जिल्हा ग्रीन झोनमध्ये येईल. अगोदरचा कालावधी २८ दिवसांचा होता. ३ मेनंतरच्या यादीसाठी १३० जिल्ह्यांचा समावेश रेड झोन, २८४ ऑरेंज झोन आणि ३१९ जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने अजूनही दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलुरू, अहमदाबाद यांना रेड झोनमध्येच ठेवले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील १४, दिल्लीचे ११, तामिळनाडूचे १२, उत्तर प्रदेशचे १९, बंगालचे १०, गुजरातचे ९, मध्य प्रदेशचे ९, राजस्थानमधील ८ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

बिहारमधील २०, उत्तर प्रदेशचे ३६, तामिळनाडूचे २४, राजस्थानचे १९, पंजाबचे १५, मध्य प्रदेशचे १९, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. तर आसाममधील ३०, छत्तीसगडचे २५, अरुणाचल प्रदेशचे २५, मध्य प्रदेशचे २४, ओडिशाचे २१, उत्तर प्रदेशचे २०, उत्तराखंडच्या १० जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.

दिल्ली एनसीआरमधील सर्व जिल्हे रेड झोनमध्ये असून हरियाणामधील गुरुग्राम ऑरेंज झोनमध्ये आणि फरीदाबाद रेड झोनमध्ये आहे. उत्तर प्रदेशचे गौतम बुद्ध नगर, मेरठ, आग्रा, सहारनपूर हे रेड झोन मध्ये आणि गाझियाबाद, हापूर, शामली ऑरेंज झोनमध्ये आहेत. राज्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी बदलही केले जातील.