Coronavirus : ‘कोरोना’ उपाययोजनांबद्दल राहुल गांधींनी केले मोदी सरकारचे ‘कौतुक’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसला लढा देण्यासाठी केंद्र सरकारने योग्य दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. अशा शब्दात खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

केंद्र सरकारने लॉकडाउन लागू केल्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोके वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1 लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून स्वागत केले आहे. भारतात करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देश लॉकडाउनमध्ये जात असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे संपूर्ण जनजीवन बंदिस्त झाले आहे.

असंघटित आणि दररोज काम करून उदरर्निवाह चालवणार्‍यांचा प्रश्न उपस्थित होत होता. त्यांच्यासह देशातील सर्वच घटकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय राज्यअर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरूवारी केली. अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषदेत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारचं कौतुक केले आहे.