Coronavirus Lockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘गिफ्ट’, मिळणार ‘आगाऊ’ पगार !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि स्टेट बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांनी देशात लॉकडाऊन असतानाही काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. लॉकडाऊन कालावधीत बँकेत येणाऱ्या कर्मचा्यांना जास्तीचा पगार दिला जाईल, अशी एसबीआयने घोषणा केली आहे. त्याच वेळी कोरोना विषाणू या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाने स्वच्छताविषयक मानदंड राखण्यासाठी आपल्या प्रत्येक बँकिंग सहाय्यकांना 2,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.

SBI देणार अतिरिक्त वेतन

लॉकडाऊन दरम्यान कार्यरत असणाऱ्या कर्मचार्‍यांना एसबीआय अतिरिक्त वेतन देणार आहे. 23 मार्च ते 14 एप्रिल या तारखेदरम्यानचे अतिरिक्त वेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत एसबीआयच्या प्रत्येक शाखेत कार्यरत असलेल्या CPCs, CACs, ट्रेझरी ऑपरेशन्स, ग्लोबल मार्केट्स, जीआयटीसी आणि आयटी सर्व्हिसेसमधील लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदा प्रत्येक बँकिंग सहाय्यकाला 2,000 रुपये देईल

बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे की त्यांचा हा प्रयोग कोरोना विषाणू या साथीच्या आजारापासून आपल्या ग्राहकांची, सामान्य लोक आणि बँक कामकाजात मदत करणाऱ्या सहाय्यकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे. कोविड -19 च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकिंग सहाय्यकांचे केंद्र साफ व स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे बँकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाने प्रत्येक सक्रिय व कार्यरत बँकिंग प्रतिनिधीला दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे की या पैशाचा उपयोग जंतुनाशक, मास्क, हातमोजे इ. खरेदी करण्यासाठी व केंद्रांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी केला जाईल. या व्यतिरिक्त बँक या कठीण परिस्थितीत सातत्याने त्यांची सेवा चालू ठेवण्यासाठी दररोज किमान पाच व्यवहार करणार्‍या प्रत्येक बँकिंग प्रतिनिधीला 4 एप्रिलपर्यंत 100 रुपये प्रतिदिवस देईल.