Coronavirus : चिंताजनक ! 48 दिवसांत 1000 संख्या गाठल्यानंतर देशात फक्त 4 दिवसांत 900 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांचा आकडा देखील वाढत आहे. गेल्या चार दिवसांत देशात 911 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद जाली असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोना विषाणूने भारतात शिरकाव केल्यानंतर 1000 जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी 48 दिवसांचा कालावधी लागला होता. तर ही संख्या गेल्या चार दिवसांत पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरूनच ही बाब समोर आली आहे. यावरून देशात कोरोना नियंत्रणात नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 हजारांवर पोहचण्यासाठी 87 दिवसांचा कालावधी लागला होता. 26 एप्रिल रोजी भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 हजार होती. पण यामध्ये झपाट्याने वाढ होत असून फक्त सहा आठवड्यात रुग्णसंख्या 2 लाख 26 हजार 770 वर पोहचली आहे.

कोरोना विषाणूचा भारतातील पहिला रुग्ण 12 मर्चला सापडल्याची नोंद झाली होती. 29 एप्रिल रोजी भारतात मृतांची संख्या एक हजारावर पोहचली. पण काही आठवड्यातच ही संख्या 6075 एवढी झाली आहे. 4 जूनपर्यंतची आकडेवारी पाहीली असता गेल्या चार दिवसामध्ये देशात 911 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारं लॉकडाऊनचा नियम शिथील करत असताना समोर येणारी आकडेवारी चिंताजनक असून भीती वाढवणारी आहे.

केंद्र सरकारने तब्बल दोन महिन्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत. हॉटेल खुली करण्याची परवानगी देतानाच सरकारनं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम घालताना ग्राहकांना स्वत:च्या मेडिकल आणि ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती देणं अनिवार्य केले आहे.