Coronavirus Impact : शेतकरी कर्जमुक्ती ‘कोरोना’च्या कचाट्यात ! बळीराजा ‘हवालदिल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर कोरोनाचा विपरीत प्रभाव पडला आहे. शेतकर्‍यांच्या खाते प्रमाणीकरणाची गती अत्यंत मंदावली आहे. गत दोन आठवड्यांत ती केवळ सरासरी 5 टक्क्यांवर आली असून प्रशासकीय स्तरावरदेखील कर्जमुक्तीचा विषय मागे पडल्याचे चित्र आहे.

कोरोना संकटाचा सामना सर्वत्र खंबीरपणे केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापूर्वी महाराष्ट्रात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया अत्यंत गतीने करण्यात येत होती. मात्र, आता कोरोनामुळे कर्जमुक्ती योजनेचे कार्यही प्रभावित झाले आहे. राज्यात 153 लाख शेतकरी आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती व शेतकर्‍यांवरील संकट लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अल्पमुदतीचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली. 27 डिसेंबरला त्याचा शासन निर्णय काढून प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

शेतकर्‍यांना योजनेचा लाभ देण्यासाठी 21 फेब्रुवारीपासून त्यांच्या कर्जखात्याची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर आधार कार्ड, विशिष्ट क्रमांक व पासबुक घेऊन शेतकर्‍यांना प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्याची सुविधा सेतू केंद्र, गटसचिव व बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. गत महिन्यापासून ही प्रक्रिया वेगाने सुरू होती. राज्यातील प्रत्येक जिल्हयात दरदिवशी साधारणत: 8 ते 10 हजार खात्यांचे प्रमाणीकरण झाले.

राज्यात करोनाचा प्रभाव जाणवू लागल्यापासून याचे प्रमाण कमालीचे घसरले आहे. खात्याचे प्रमाणीकरण बाकी असतानाही करोनाच्या धास्तीमुळे लाभार्थ्यांकडून ते पुढे ढकलण्यात येत आहे. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून शेतकरी कर्जमापी पृकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. बहुसंख्य शेतकर्‍यांचे वास्तव्य लहान शहरे किंवा ग्रामीण भागात आहे. कर्जमुक्ती योजनेचा विषय प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडित आहे. कोरोनामुळे प्रमाणीकरणाचे कार्य प्रभावित झाले आहे. त्याची दहशत ग्रामीण भागातही असल्याचे स्पष्ट होते.