Coronavirus : अभिनेता प्रभासनं केली ‘बाहुबली’ सारखी मदत, अनेक नेत्या-अभिनेत्यांकडून ‘कोरोना’ग्रस्तांसाठी ‘अर्थ’सहाय्य

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाच्या थैमानाला सामोरे जाण्यासाठी अनेक नागरिक एकमेकांना मदत करीत आहेत. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 700 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर सरसावले आहेत. त्यामध्ये अभिनेते, कलाकार, राजकीय नेत्यांसह कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी अभिनेता प्रभासने 4 कोटींची मदत केली असून राष्ट्रवादीचे आमदार-खासदारही आपला एक महिन्याचा पगार सरकारला मदतीसाठी देणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. सर्व जण आपापल्या परीने, क्षमतेनुसार यात योगदान देत आहेत. यामध्ये सिनेकलाकार, खेळाडू, राजकीय नेते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कठीणसमयी मदतीचा हात पुढे केला आहे.’बाहुबली’ अर्थात प्रभासने कोरोना महामारीसोबत दोन हात करण्यासाठी चार कोटी रुपयांची मदत केली आहे. प्रभासने गुरुवारी (26 मार्च) 3 कोटी रुपये पंतप्रधान मदतनिधीमध्ये तर 50-50 लाख रुपये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केले.

प्रभास नुकताच जॉर्जियाहून परतला आहे. आगामी ’प्रभास 20’ या चित्रपटाचे शूटिंग तिथे सुरु होते. तिथून परतल्यानंतर खबरदारी म्हणून प्रभासने स्वत:ला होम क्वॉरन्टाईन केले होते. त्याआधी तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांनीही दोन कोटी रुपये मदत निधीला दान केली होती. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही प्रत्येकी 50 लाखांची मदत करणार असल्याचे त्याने सांगितले होते. याशिवाय पवन कल्याण यांचा पुतण्या रामचरणने 1 कोटी 40 लाख, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीने 1 कोटी आणि महेश बाबूने 1 कोटी रुपये दान केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कॉमेडियन कपिल शर्मा देखील मदतीसाठी समोर आले आहेत. हृतिक रोशनने मुंबई महापालिका कर्मचार्‍यांसाठी एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर कपिल शर्मानेही पंतप्रधान मदत निधीमध्ये 50 लाख रुपयांची रक्कम दान केल्याचे म्हटले आहे.याशिवाय करण जोहर, आयुष्मान खुराना, नितेश तिवारी, तापसी पन्नू, सोनम कपूर, दिया मिर्झा हे कलाकारही रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.