नगरसेवकाचा तरुणावर तलवारीने हल्ला, मालेगावात तणाव

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील मदरशाच्या देणगी हिशोबावरुन झालेल्या वादातून नगरसेवक व त्याच्या भावाने तलवारीने हल्ल्या केल्याने त्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. कमालपुरा भागातील शेर अली चौकात शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकारात एजाज अहमद मंजुर अहमद (वय ४५, रा. कमालपुरा) हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

हा प्रकार घडल्यानंतर आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल नगरसेवक मोहम्मद मुस्तकिम डिग्नीटी यांच्यासह कार्यकर्त्यांनी संशयितावर अटक करण्याची मागणी करुन पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन लवकरच संशयितांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

या प्रकरणी मोहम्मद शोएब शब्बीर अहमद (वय २०, रा. कमालपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक फारुख खान, फौजुल्ला खान, शाहरुख खान, आरीफ खान व फैसल अशा चौघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी एजाज अहमद याला अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.