तोडफोड होऊ नये, म्हणून महापालिकेत चोख पोलीस बंदोबस्त पुरवा, नगरसेवक योगेश ससाणे यांची मागणी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवडणुक २२ नोव्हेंबरला होत आहे. यापूर्वी स्वीकृत सदस्य निवडणुकीच्या वेळी पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. हे पाहता महापौर निवडणुकीत तोडफोड होऊन महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून निवडणुकीच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली आहे. ससाणे यांनी महापालिका आयुक्त राव यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
महापालिकेत नेमण्यात येणाऱ्या स्वीकृत सदस्यपदासाठीच्या निवडणुकीच्या वेळी २०१७ मध्ये भाजपाच्या नाराज इच्छुकांनी महापालिकेत येऊन मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. पुणे महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते.

महापौरपदासाठी २२ नोव्हेंबरला निवडणुक होत आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. भाजपा आणि दोन्ही काँग्रेसचे उमेदवार आपापले अर्ज भरतील. भाजपाकडे बहुमत असल्याने पक्ष ज्यांना उमेदवारी देईल, ते निवडून येणार हे नक्की. मात्र, मागील इतिहास पाहता ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांचे समर्थक महापालिकेत येऊन राडा घालतील, अशी भिती योगेश ससाणे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारणात महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून महापालिका इमारत व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा व संभाव्य तोडफोड, हाणामारी होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

Visit : Policenama.com