महापालिका कर्मचारी आजपासून संपावर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – घनकचरा व्यवस्थापन विभागात आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी भरतीला विरोध करत महापालिका कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहे. कर्मचारी यांनी दिलेल्या नोटिसवरून प्रशासनाने साधी चर्चाही केली नाही, असा आरोप युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.

घनकचरा विभागात सॅनिटरी इन्स्पेक्टर, संगणक ऑपरेटर व अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी खासगी कंत्राटदाराकडून निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. सदर प्रक्रियेला महापालिका कर्मचारी युनियने आक्षेप घेतला आहे. सदर ठिकाणी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या पदोन्नत्तीने भरण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात युनियनने नोटीस बजावून २६ मार्चपासून संपावर जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही. युनियनशी साधी चर्चाही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविलेली नाही. त्यामुळे कर्मचारी आजपासून संपावर जात आहे.

कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याची मागणी

महापालिका कर्मचार्‍यांच्या कालबध्द पदोन्नत्तीच्या फरकाच्या रकमाही मनपाने दिलेल्या नाहीत. सुमारे पावणेदोन कोटी रुपये थकीत आहेत. सदर थकीत रक्कम देण्याबाबत प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. सर्व रकमा तात्काळ मिळाव्यात, अशी कर्मचार्‍यांची मागणी आहे. याबाबतही आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला होता. प्रशासनाशी या विषयावर चर्चेत तोडगा न निघाल्यामुळे आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.