कष्टकरी कुटुंबासाठी अन्नधान्याची 10 हजार पॅकेट्स घरपोच पोहचवण्यास सुरुवात : नगरसेवक आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वायरस च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हातचे काम थांबलेल्या कष्टकऱ्यांपुढे दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाने या कष्टकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केली आहेत. परंतु यासाठी मोठी यंत्रणा काही लागणार ही शक्यता गृहीत धरून अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावून ‘माणुसकीच्या ‘ लढयात सहभागी झाले आहेत. या लढ्यात खारीचा वाटा म्हणून अशा कष्टकऱ्यांना अन्नधान्याची पाकिटे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पुढील काळात माफक दरात घरपोच भाजीपाला देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नगरसेवक आबा बागुल यांनी सांगितले.

आबा बागुल म्हणाले, की कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांकडील अन्नधान्य व मोडकी तोडकी बचत ही संपू लागली आहे. यासाठी तांदूळ, हरभरा डाळ, मसाला, तेल, पोहे, साखर, चहापत्ती, डेटॉल साबण, बाथ सोप, असे किमान चार जणांच्या कुटुंबाला किमान ४-५ दिवस पुरेल एवढे साहित्य असलेले १० हजार पॅकेट्स तयार करण्यात आले आहे. प्रभागातील अण्णाभाऊ साठे वसाहत, तावरे कॉलनी वसाहत या परिसरातून हे पार्सल वाटपाची सुरुवात करण्यात आली आहे. हे पार्सल थेट घरपोच देण्यात येत असून नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात येत आहे.

अमित बागुल यांनी सांगितले की , यापुढील टप्प्यात अगदी माफक दरात भाजीपाला घरपोच देण्यासाठी प्रयत्न आहेत. यासाठी काही शेतकऱ्यांनी मिरची, भेंडी, बटाटा, कांदा, वांगी याचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. लवकरच यासाठी यंत्रणा उभारून मागणीनुसार घरपोच माफक दरात भाजीपाला पोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.