‘मुख्यमंत्र्यांसोबतच आषाढीच्या महापूजेचा मान सफाई कर्मचारी दाम्पत्याला द्यावा’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती गर्दी टाळण्यासाठी यंदा आषाढी वारीसाठी एकही वारकरी भाविक पंढपुरात येणार नाही. त्यामुळे एकादशीच्या शासकीय महापूजेस मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संसर्गाविरुद्ध लढणाऱ्या सफाई कर्मचारी दाम्पत्याला सहभागी करून घेण्याची मागणी करणारे निवेदन नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी मंदिर प्रशासनाला दिलं आहे.

‘मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेस दरवर्षी परंपरेनुसार दर्शनाच्या रांगेत असणाऱ्या पहिल्या वारकरी दाम्पत्याला सहभागी होण्याचा मान मिळतो. पण यावेळेस वारी भरणार नसल्याने वारकरी सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी उदार होऊन कोरोनाविरोधात लढणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्याची पोचपावती, म्हणून यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेस सहभागी होण्याचा मान सफाई कर्मचारी दाम्पत्याला देण्यात यावा, असे वाघमारे यांनी म्हटलं आहे. वर्षानुवर्षे गावं आणि शहर स्वच्छता करणारा हा वर्ग वारकऱ्यांसाठी गाव स्वच्छ ठेवतो. मात्र, त्याला कधीच मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतला आले नाही. यंदा ही संधी सरकारने दिल्यास या वर्गाला आयुष्यभराचे समाधान लाभेल. यासंदर्भातले निवेदन वाघमारे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे दिले आहे.

दरम्यान, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्याना पूजेसाठी यायचं असेल तर त्यांना येऊ दिलं पाहिजे. विठ्ठल आमचं आराध्य दैवत आहे. आम्ही त्यांना संपूर्ण आध्यात्माचा राजा म्हणतो. मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे हा मुख्यमंत्र्यांचा मान नाही, तर मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे की, आमच्या राजाची त्यांनी पूजा केली पाहिजे.’