गुप्त आणि उघड चौकशीमध्ये यापूर्वी क्लीनचिट दिली : नगरसेवक सुभाष जगताप

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त आणि उघड चौकशीमध्ये यापूर्वी क्लीनचिट दिली आहे. असे असतानाही केवळ राजकीय दबावाखाली माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र बऱ्हाटे यांनी दिलेल्या खोट्या माहीतीच्या आधारे याच विभागाने माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर खोटा गुन्हा दाखल केला, हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रातील विसंगत माहितीतून समोर येत आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

उत्पन्ना पेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी नगरसेवक सुभाष जगताप आणि त्यांची पत्नी विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यावेळी जगताप दाम्पत्य यांना अटक करून जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लाचलुचपत विभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पांडुरंग इंगळे या राजकीय विरोधकाने 1992 मध्ये माझ्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने याप्रकरणी आमची गुप्त आणि उघड चौकशी केली होती. तक्रारीत काही तथ्य न आढळल्याचे स्पष्ट करत लाचलुचपत विभागाने चौकशी बंद करून आम्हाला क्लीनचिट दिली.

यानंतर बऱ्हाटे यांनी 2014 मध्ये माझ्या विरोधात पुन्हा लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यावेळी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मी प्रतिज्ञा पत्रात दिलेल्या संपत्तीच्या विवरणातील माहितीला आव्हान देत त्यांच्यासोबत स्पेस असोसिएट या संस्थेत भागीदारी असून संस्थेच्या नावे धनकवडी येथे 15 आर जमीन असून ती माहिती मी प्रतिज्ञा पत्रात दिली नाही, असा त्यांचा आरोप होता. त्यांनी यासंदर्भात दिलेली कागदपत्र बनावट असल्याचे लाचलुचपत विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळेच दोषारोप पत्रात या जागेचा उल्लेख केलेला नाही. फेरचौकशीत माझी डोणजे येथील आणि लक्ष्मीनगर येथील दुकानाची किंमत रेडिरेकनर नुसार वाढली आहे. विशेष असे की जमिनीचे व्यवहार असो अथवा व्यवसाय असो याची सगळी पेमेंट्स चेकने दिली असून त्याचा इनकम टॅक्सही भरला आहे.

फिर्यादी मध्ये माझ्या बँक खात्यात 35 लाख 52,523 रुपये रक्कम असल्याचे लाचलुचपत विभागाने नोंदविले होते. प्रत्यक्षात तपासात आणि बँकेने दिलेल्या पत्रात केवळ 6 लाख 15 हजार 36 रुपये शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले.  लाचलूचपत उत्पन्न विभागाने उत्पन्न आणि खर्चाचा तक्ता चुकीचा दाखवीत 46 लाख 14 हजार 722 रुपये अपसंपदा केल्याचा ठपका ठेवला. परंतु त्यांच्याच दोषारोप पत्रातील आकडेवारी वरून ही रक्कम 10 लाख, 9 हजार 611 च्या वर जात नाही.

एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यांपेक्षा अपसंपदेची रक्कम असेल तरच गुन्हा दाखल होतो. केवळ आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी लाचलुचपत विभागाने सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावाखाली खोटी आकडेवारी देऊन आम्हाला गुन्ह्यात अडकवले आहे. हा गुन्हा काढून टाकावा यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असेही जगताप यांनी नमूद केले.

रविंद्र बऱ्हाटे हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे हस्तक असून त्यांनी माझ्यासह अनेकांवर खोट्या आणि अर्धवट कागदपत्रांच्या आधारे गुन्हे दाखल केले आहेत. प्रत्यक्षात बऱ्हाटे यांनी बनवेगिरी करून 2 हजार कोटींची मालमत्ता जमविली आहे. हे प्रकरण मी बाहेर काढले असून याची उच्चस्तरावर चौकशी सुरू आहे. याच रागातून त्यांनी माझ्याविरोधात कुंभाड रचले आहे. त्याला सत्ताधारी आणि पोलिसांचा पाठिंबा आहे. परंतु याप्रकरणी लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट होईल, असा दावा जगताप यांनी यावेळी केला.