BHR च्या ठेवीदारांची माहिती मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचा सीआयडीशी पत्र व्यवहार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेबाबत (बीएचआर) पुण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यात तपास असताना गेल्या महिन्यात जळगावात छापेमारी करत लेखापालसह ठेवीदार संघटनेच्या अध्यक्षला अटक केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी ‘सीआयडी’कडे असणारी ठेवीदारांची माहिती प्राप्त करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. ठेवीदारांची माहिती मिळाल्यास प्रकरणाचा सखोल तपास करण्यास पोलिसांना मदत होणार आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने यापूर्वीच बीएचआर संदर्भात आर्थिक गैरव्यवहार उजेडात आणला आहे.

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत असून, त्यांनी नुकतीच सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांकला (वय ४०), महावीर माणिकचंद जैन (वय ३७), ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (वय ४५), सुजित सुभाष बाविस्कर (वय ४२), कमलाकर भिकाजी कोळी (वय २८, सर्व रा. जळगाव) यांना अटक केली होती. याप्रकरणात पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून, तपास सखोल व्हावा तसेच त्याला गती मिळावी यासाठी सीआयडीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ‘सीआयडी’कडून मिळणाऱ्या माहितीमुळे ठेवीदारांची एकूण संख्या, त्यांची किती रक्कम आहे, किती ठेवी थकीत आहेत, अशा स्वरूपाची माहिती मिळणार आहे. त्याचा उपयोग आर्थिक गुन्हे शाखेला होणार आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारासंबंधी ‘सीआयडी’ने त्यांच्याकडे दाखल असलेल्या ७३ गुन्ह्यांचा तपास करून त्याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलेले आहे. सीआयडीने सर्वात आधी बीएचआरचा गैरव्यवहार पुढे आणला होता.