कांद्यावरील निर्यात बंदी उठवुन कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करण्यासाठी कृषी मंत्री तोमर यांच्याशी पत्रव्यवहार

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा)- लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून कांदा दरात घसरन सुरु आहे. अवकाळी पावसाने कांदा उत्पादनात घट झाल्याने मिळणारे दर हे शेतकरी वर्गाला परवडत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी तसेच कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करावी अशी विनंती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री छगन भुजबळ आणि खा. भारती पवार यांना लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापदी सुवर्णा जगताप यांनी पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

सद्यस्थितीत बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर दररोज साधारणतः ३० ते ३५ हजार क्विंटल अली खरीप कांद्याची विक्री होत आहे. परंतु सप्टेंबर २०१९ पासुन संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने २९ सप्टेंबर २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणा-या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ०३ डिसेंबर २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापा-यांना २५० क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापा-यांना ५० क्विंटलपर्यंत (०५ मे. टन) कांदा साठवणुकीची मर्यादा लागु केल्याने येथील व्यापारी वर्गास मोकळ्या स्वरूपातील कांदा खरेदीमुळे त्यांच्या दैनंदीन कांदा खरेदीवर बंधन आलेले आहे.

वास्तविक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत विक्रीस येणा-या अली खरीप कांद्याची टिकवण क्षमता ही कमी असल्याने येथील शेतक-यांना सदरचा कांदा शेतातुन काढलेनंतर लगेच विक्री केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळे येथील बाजार समित्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर सदरचा कांदा विक्रीस येत आहे. तसेच लवकरच येथील बाजार समित्यांमध्ये लेट खरीप (रांगडा) कांदाही मोठ्या प्रमाणावर विक्रीस येणार आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील स्थानिक कांदाही बाजारात दाखल झाला असुन मध्यंतरीच्या काळात केंद्र शासनाने परदेशातुन आयात केलेला कांदा महानगरांमध्ये दाखल झाल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कांदा उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पुर्ण होऊन शिल्लक राहीलेला कांदा निर्यातीच्या माध्यमातुन परदेशी बाजारपेठेत रवाना झाल्यास कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहणेस मदत होणार आहे.

डिसेंबर २०११ मध्ये येथील बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर अर्ली खरीप (पोळ) कांदा कमीत कमी रू. १,५००/-, जास्तीत जास्त रू. ११,१११/- व सर्वसाधारण रू. ६.४८९/- प्रती क्विंटल दराने विक्री झाला आहे. मात्र शुक्रवार, दि.१०/०१/२०२० रोजी सदरचा कांदा कमीत कमी रू. १,०००/-, जास्तीत जास्त रु.३,५४०/- व सर्वसाधारण रू. २,७००/- प्रती क्विंटल दराने विक्री झाला आहे.

मागील महिन्याच्या तुलनेत सध्या कांद्याच्या सर्वसाधारण भावात रू.३,७८९/- प्रती क्विटल दराने घसरण झालेली आहे. अशीच कांदा बाजारभावात घसरण सुरू राहील्यास शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडेल त्यामुळे केंद्र शासनाने दि. २९ सप्टेंबर, २०११ रोजी कांदा निर्यात बंदी संदर्भात काढलेली अधिसुचना रद्द करून दि. ०३ डिसेंबर, २०१९ चे आदेशानुसार कांदा साठवणुकीवर लागु केलेली मर्यादा काढावी अशी मागणी लासलगांव बाजार समिति सभापती सुवर्णा जगताप यांनी केली आहे.