कार्यालय अधीक्षकास 1.5 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं पकडलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दीड लाखांची लाच घेणा-या एरंडोल नगरपालिकेच्या कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधीक्षकाला धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. शुक्रवारी (दि. 12) दुपारी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संजय दगडू ढमाळ (वय-51 रा. म्हाडा कॉलनी अमळनेर) असे अटक केलेल्या लाचखोर अधिका-याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिकेच्या दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देण्यासाठी तसेच तक्रारदारांच्या इतर गाळ्यांना नोटीस न देण्यासाठी आरोपीने 2 लाखांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती दीड लाख रूपये द्यायचे ठरले. दरम्यान तक्रारदारांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी (दि.12) एसीबीने सापळा रचून आरोपी ढमाळ यास दीड लाख स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी रात्री एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे उपअधिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवणे, संतोष हिरे , कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम, सुधीर मोरे आदीनी ही कारवाई केली आहे.