काय सांगता ! होय, लाचखोर तहसीलदाराने केली चक्क 20 लाखांची ‘होळी’

सिरोही : पोलीसनामा ऑनलाईन –   लाच घेणा-या एका तहसीलदाराने पकडले जाण्याच्या भीतीने घरातील गॅसवर 20 लाख रुपये जाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या सिरोही येथे घडली आहे. एका प्रकरणातील चौकशीचे धागेदोरे या तहसीलदारापर्यंत पोहोचले होते, त्यामुळे त्याने हा कारनामा केला आहे. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

कल्पेश जैन असे या तहसीलदाराचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, पिंडवाड्यातील महसूल निरीक्षकाला एका टेंडरच्या बदल्यात 1 लाखांची लाच घेताना एसीबीने पकडले होते. त्यावेळी त्याने तहसीलदाराकरता हे पैसे घेतल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे एसीबीच्या टीमने तहसीलदार कल्पेश जैन यांच्या घरावर छापा टाकला. एसीबीला पाहून जैनने दरवाजा आतून बंद करून घेतला. एसीबीने कटरने दरवाजा तोडला आणि जे काही पाहिले ते धक्कादायक होते. जैनने 20 लाख रुपये गॅसवर जाळले होते. हा सर्व प्रकार व्हिडीयोमध्ये कैद झाला आहे.