2 लाख रुपयांची लाच स्विकारणारे दोनजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, उपविभागीय अधिकारी फरार

बिलोली (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रक सोडण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तर उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले हा फरार झाला आहे.

बिलोली तालुक्यातील लाल रेती देशभर प्रसिद्ध आहे. या मातीला तेलंगणा, कर्नाटक राज्यात मोठी मागणी आहे. तालुक्यामध्ये चार वाळू पट्टे आहेत. दोन महिन्यापूर्वी महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रक ताब्यात घेतले होते. त्यावर दंड आकारण्यात आला होता. दंडाची रक्कम भरून देखील ट्रक सोडण्यात आले नव्हते. उपविभागिय अधिकारी भोसले याने निझामाबाद येथील खासगी व्यक्ती श्यामकुमार बोनिंगा याच्या मार्फत ट्रक मालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. तर आंध्रप्रदेशातील मिरयालगुडा येथील श्रीनिवास जिनकला याने ट्रक मालक आणि भोसले यांच्या मध्यस्ती केली होती. बोनिंगा याने शहरातील बसस्थानक परिसरात ३१ ऑगस्ट रोजी लाच स्विकारली होती. ही लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले होते. यानंतर उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले, श्यामकुमार बोनिंगा आणि श्रीनिवीस जिनकला यांच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक कल्पना वारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस नाईक हनुमंत बोरकर, किशन चिंतोरे, सचिन गायकवाड, अमरजितसिंह चौधरी, अंकुश गाडेकर, सुरेश पांचाळ, मारोती सोनटक्के, अनिल कदम यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –