‘कोरोना’च्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार, चंद्रकांत पाटलांचा आरोप

मावळ/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या अवघ्या देशावर कोरोनाचं संकट आहे, तसेच महाराष्ट्रात देखील वेगळी परिस्थिती नाही. परंतु कोरोना महामारीवरून राज्यात चांगलंच राजकारण तापल्याचे दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. धारावीत दीडशे रुपयांना पीपीई किट मिळतं, ब्रँडेड साडेचारशे मग 1300 रुपयांना किट हे सरकार घेत असून, कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दूध दरवाढीसाठी महाराष्ट्रात भाजपकडून शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी पुण्यातील मावळमध्ये झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

नाचता येईना म्हणे अंगण वाकडे
लॉकडाऊनच्या काळात आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतीतलं कळत नाही. परंतु रात्री 1 वाजता पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जशे लक्ष घालता तसे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घाला. नाचता येईना म्हणे अंगण वाकडे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

अजित पवार शेतकरी आहेत ना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत ना, त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूध धंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति 10 रुपये, भुकटीला 50 रुपये अनुदान दिले पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांना मारुन टाकायचय का ?
हे सरकार रोज असे निर्णय घेत आहे की सर्वसामान्यांना त्रास होईल. खत बी-बियाणासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. खतं मिळत नाही, हे सरकार बांधावर खत बी बियाणे देणार होते ? कसलं बांधावर, दिवसभर रांग लावली तर एक खताच पोत मिळतंय का ? या सरकारने नेमकं ठरवलं आहे तरी काय ? शेतकऱ्यांना मारुन टाकायचय का ? असा संतप्त सवाल चंद्रकांत पाटील यांनी सरकारला विचारला आहे.