Coronavirus : … तर रस्त्यावर उतरून चोप देऊ, मनसेचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिली जात असून मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा घणाघाती आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकारची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून चोप देऊ, असा सज्जड इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

कंत्राटदार गँगला बाहेरचा माणूस नको
संदीप देशपांडे यांनी सांगितले की, शवपिशव्यांच्या खरेदीत सुद्धा चांगल्या दर्जाच्या पिशव्या पुरवणाऱ्या औरंगाबादच्या वेदांत इन्नोटेक कंपनीचं कंत्राट रद्द करून इथल्या कंत्राटदारांना दिलं जात आहे. कारण इथल्या कंत्राटदारांच्या गँगला बाहेरचा माणूस नको असतो, असा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व प्रकारचा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून चोप देऊ असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.

मनसेचे बारीक लक्ष
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हापासून मनपा काही ना काही खरेदी करत आहे. मात्र, या खरेदीवर मनसेचे बारीक लक्ष आहे. मनपाच्या भ्रष्टाचारात अनेक लोक भरडले जात आहेत. मृतदेहांच्या पिशव्यांबाबतचा मुद्दाही आता समोर आला आहे. यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे देशपांडे यांनी सांगितलं. मनपाने रक्कम ठरवावी पण दर्जाशी तडजोड करून नये. लोकांशी खेळ खेळला जातोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टक्केवारीची मागणी
संदीप कल्याणकर यांनी सांगितले की, समुद्रातून मृतदेह काढले जातात. ते मृतदेह ठेवण्यासाठी आम्ही मागील 10 वर्षापासून पिशव्या बनवत आहोत. आमच्या कंपनीच्या बॅग सुमारे दोनशे किलो वजन उचलू शकतात. आमची बॅग सगळ्या निकषांप्रमाणे आहे. योग्य त्या दर्जाची आहे. पण आम्ही औरंगाबादचे आहोत. त्यामुळे आम्हाला यातलं काही कळत नाही, असा अपप्रचार केला जात आहे. तसेच त्यांनी सांगितले की, एकाने फोन केला आणि टक्केवारी मागितली. मनपाचं कंत्राट हवं असेल तर टक्केवारी दिली तरच पुढचं काम मिळेल असे सांगण्यात आले. त्याला विरोध केल्याने कंत्राट रद्द करण्यात आलं.