कॉसमॉस सायबर दरोडा : पुण्यातून आणखी एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ऑगस्ट २०१८ मध्ये कॉसमॉस बँकेवर सायबर दरोडा टाकून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा बँकेला गंडा घातला होता. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून आज (शुक्रवार) पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याने मुंबई येथील एटीएममधून ३ लाख ५० हजार काढल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिली. ही कारवाई आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली.

मोहनलाल ताराजी राठोड (रा. विश्रांतवाडी मुळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोहनलाल राठोड हा उच्च शिक्षीत असून तो विश्रांतवाडी येथील अंबिका मेडिकल्स येथे मागील एक वर्षापासून कामाला आहे. पुण्यात येण्यापूर्वी त्याने ५ ते ६ वर्षे  मुंबईत मेडिकल दुकानात काम केले आहे. कॉसमॉस दरोडा प्रकरणात त्याला आज अटक करुन चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्याने मुंबई येथील ४ ते ५ एटीएम मधून ३ लाख ५० हजार रुपये काढल्याची कबुली दिली आहे. पैसे काढताना त्याच्याबरोबर आणखी तीन इसम होते असे तो पोलिसांना सांगत असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करित आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून १ मोबाईल हँडसेट व १ कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम कार्ड जप्त केले आहे. या गुन्ह्यात आत्तापर्य़त अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १० झाली आहे.

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरमध्ये व्हयरस सोडून सिस्टीम हॉक करुन बँकेची ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. बँकेचा सर्व्हर हॉक करुन ज्या वेळीत पैसे काढण्यात आले त्यावेळी पुण्यातील १७१ तर राज्यातील ४२८ एटीएम कार्डचा वापर करण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  असून पुढील तपास सायबर पोलीस ठाणे करीत आहे.