गादी भंडाराला आग ; लाखोंचे नुकसान

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जुना वडजई रोड कबीर गंज भागातील गादी भंडारला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सरकी यंत्रामध्ये ठिणगी पडून अचानक पेट घेतल्याने ही आग लागली आहे.

या बाबत मिळलेली माहिती अशी की, जुना वडजई रोड जवळ मुस्ताक यासिन पिंजारी यांचे गादी भंडार दुकान आहे. दुपारच्या वेळी हे यंञाद्वारे कापूस पिंजण्याचे काम करत असताना सरकी यंञात अडकून त्यातील ठिणगीतून अचानकपणे आग लागली. या आगीत दुकानातील कापूस पिंजणी यंञ, कापूस, कापड आगीच्या भक्षस्थानी पडले. पिंजारी यांनी आग लागताच आरडा ओरड केली. जवळपास असलेल्या नागरीकांनी आगीवर पाणी मारून आग विजवण्याचा प्रयत्न केला.

आगीबाबत मुक्तार मन्सुरी यांनी मनपा अग्निशामक दलाला माहिती दिली. आगीची माहिती मिळताच मनपाचे दोन बंब काही मिनिटातच दाखल झाले व त्यांनी गादी भंडारातील आगीवर पाण्याचा मारा करत काही मिनिटांत आग अटोक्यात आणली. यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. परंतु, पिंजारी यांनी सांगितले की, गादी भांडारातील साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.

आगी बाबत आझाद नगर पोलीस स्टेशनला अग्नि उपद्रव ३/७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे काम उशीरापर्यत सुरु होते.