मतमोजणी मॅनेज होती, मराठवाडा पदवीधर मतमोजणी प्रक्रियेवर भाजपचा आक्षेप, न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत प्रस्थापित पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक विभागीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मतमोजणी केली आहे. अनेक मतपत्रिकांवर एकाच हस्ताक्षरातील पसंती क्रम, मोजणी करताना 20 टक्के मतपत्रिका कोऱ्या होत्या, असे आक्षेप घेत मोजणी बूथनुसार न करता संपूर्ण मराठवाड्यातील मतपत्रिका एकत्र करून केल्याने यात मोठा घोळ झाल्याची तक्रार करत मतमोजणी प्रक्रियेवर भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी आपण कोर्टात धाव घेणार असल्याचेही बोराळकर म्हणाले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पहिल्या पसंतीची 1 लाख 16 हजार 638 मते घेत तब्बल 57 हजार 895 मताने विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय आहे. बोराळकर यांनी आता संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. जवळपास 80 टक्के बुथकेंद्रातील मतदान झालेल्या मतांपेक्षा जास्त मतपत्रिका किंवा कमी भरलेल्या आहेत, सर्वमतपत्रिका एकत्र केल्यानंतर त्यातील 20 टक्के मतपत्रिका कोऱ्या होत्या, बूथ अधिकाऱ्यांनी सही केलेली व मतपत्रिकांवरील सही अजिबात जुळत नव्हती, 75 टक्के मतपत्रिकांवर सतीश चव्हाण यांच्यासमोर पहिल्या क्रमांकाचा पसंतीक्रम एकाच हस्ताक्षरातील आहे, चव्हाण यांचा पसंतीक्रम असलेल्या मतपत्रिका सलग येत होत्या असे आक्षेप त्यांनी घेतले आहेत.

यावर निवडणूक अधिका-याकडे कोणतेही उत्तर नसल्याचे बोराळकर यांनी सांगितले आहे.
अपक्ष उमेदवारांचाही आक्षेप धनदांगडग्या राजकीय लोकांनी लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे. आपल्यासह इतर 5 ते 6 अपक्ष उमेदवारांनी मतमोजणीवर शंका घेतली असून निवडणूक अधिका-यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सर्वांच्यावतीने कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे बोराळकर यांनी सांगितले.

You might also like