कुंभमेळा किंवा मंदिरांमुळे देशाची प्रगती होत नाही : खासदार सावित्रीबाई फुले 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनुसूचित जाती- अनुसूचित जमातीतील लोकांना त्यांच्या हक्कासाठी आणि रोजगारासाठी लढा द्यावा लागत आहे. कुंभमेळा किंवा मंदिरांमुळे देशाची प्रगती होणार नाही, अशी टीका करत खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपाला फटकारले आहे. प्रयागराज येथे कुंभ २०१९ होणार असून यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक आणि संत उत्तर प्रदेशमध्ये पोहोचणार आहेत. कुंभ २०१९ साठी उत्तर प्रदेश सरकारने सुमारे १०० कोटी रुपयांची तरतुद केली आहे. या पाश्र्वभूमीवर खासदार सावित्रीबाई फुले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सावित्रीबाई फुले म्हणाल्या, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांना त्यांचे हक्क आणि रोजगारासाठी लढा द्यावा लागतोय आणि उत्तर प्रदेश सरकार कुंभ तसेच मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. देशाची प्रगती कुंभ किंवा मंदिरांमुळे होत नाही. तर संविधानाची अंमलबजावणी केल्यानेच प्रगती शक्य आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधील खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. भाजपा समाजात फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत सावित्रीबाई फुले या भाजपाविरोधी महाआघाडीतर्फे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी नुकतीच लखनौत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. नरेंद्र मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Happy New Year २०१९ : सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत ! 
कोरेगाव-भीमाच्या विजयीस्तंभावर आज उसळणार अनुयायांची गर्दी