धक्कादायक ! पुण्यातील बिबवेवडीत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दाम्पत्याचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दार, खिडक्या बंद ठेवून घरात टी व्ही पहात बसलेल्या एका दांपत्याचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अविनाश सदाशिव मजली (वय ६४) आणि त्यांची पत्नी अपर्णा अविनाश मजली (वय ५४, दोघे रा. गणेश विहार, बिबवेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अविनाश मजली यांनी ११ फेबु्रवारी रोजी आपल्या घरी पेस्ट कंट्रोल करुन घेतले होते. त्यामुळे ते आपला भाऊ अशोक मजली यांच्या घरी सकाळी ९ वाजल्यापासून गेले होते.

दिवसभर ते भावाच्या घरी थांबले. भावाने आज येथेच थांबा असे सांगितले पण, ते सायंकाळी ७ वाजता आपल्या घरी परतले. पेस्ट कंट्रोल ज्यांच्याकडून करुन घेतले होते. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी घरी आल्यावर खिडक्या, दारे उघडुन ठेवले नाहीत. तसेच फॅनही सुरु केला नाही. घरात ते तसेच टिव्ही पाहत बसले होते. त्यानंतर काही वेळात त्यांना चक्कर आली. सायंकाळी सव्वा सात वाजता त्यांची मुलगी श्रावणी मजली या घरात आल्या. तेव्हा त्यांना आई वडिल हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांनी दोघांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पेस्ट कंट्रोल केल्यानंतर आवश्यक ती काळजी न घेतल्याने पुणे शहरात यापूर्वी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर कंपनीने दिलेल्या सुचनाचा आवश्यक अंमलबजावणी करावी. घरातील पेस्टचा विषारी वास बाहेर जात नाही. तोपर्यंत घरात जाऊ नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.