6 वर्षाच्या मुलाने केली 67 लाख रुपयांच्या सामानाची चोरी, पालकांनी तयार करुन पाठवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका सहा वर्षांच्या मुलाने 67 लाख रुपयांच्या सामानाची चोरी केली आहे. या चोरीसाठी पालकांनी त्याला प्रशिक्षण दिले होते. आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलाने दुकानातून 18 कॅरेट सोन्याचे घड्याळ चोरले. चोरीची घटना होण्यापूर्वीच जोडपे, इली पॅरा आणि मार्टा पॅरा लक्झरी स्टोअरमध्ये गेले होते आणि त्यांनी त्याच वेळी फोटो क्लिक केला होता. पाच दिवसांनंतर, ते आपल्या सहा वर्षाच्या मुलासह स्टोअरमध्ये गेले आणि यादरम्यान मुलाने मौल्यवान घड्याळ चोरले.

खरं तर, कपलने आपल्या मुलाला बनावट घड्याळ देऊन पाठवले होते, जे त्याने चोरीच्या घड्याळाच्या जागेवर ठेवले होते. यामुळे स्टोअरच्या कर्मचार्‍यांना ही चोरी त्वरित पकडता आली नाही. दुसर्‍या दिवशी एका कर्मचाऱ्याने घड्याळ बदलताना पाहिले तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली. रोमानियाचा रहिवासी असलेले हे दांपत्य चोरीच्या घटनेनंतर ब्रिटन सोडण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते पळण्यापुर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.

या जोडप्याने 19 सप्टेंबर 2020 रोजी मुलाच्या माध्यमातून चोरीची घटना घडवून आणली होती. या गुन्ह्यासाठी कोर्टाने मुलाच्या वडिलांना 18 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली, तर आईला 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.