हनीमूनसाठी ‘कतार’ला गेलेले मुंबईतील एक जोडपे पोहचले जेलमध्ये, कारागृहातच दिला मुलीला जन्म

पोलिसनामा ऑनलाइन – विवाहानंतर हनीमूनचा प्लॅन करणे प्रत्येक नवीन जोडप्याचे स्वप्न असते, परंतु मुंबईच्या एक नवविवाहित जोडप्याने स्वप्नातही विचार केला नसेल की, त्यांचे हनीमून त्यांना कतारच्या जेलमध्ये पोहचवेल.

होय, मुंबईत राहणारे एक जोडपे शरीक आणि ओनिबा यांच्याबाबतीत असे घडले आहे. या नवदाम्पत्यासाठी त्यांच्या एका नातेवाईकाने मोफत कतारला जाण्याचे हनीमून पॅकेज बुक केले होते. परंतु, नातेवाईकाने त्यांच्या सामानात चार किलो अमली पदार्थ ठेवले. यानंतर हे जोडपे पकडले गेले आणि अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपात एक कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला, सोबतच तेथील न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली.

पीडित जोडप्याची काकी तबस्सुम रियाज कुरैशीने दिलेल्या फ्री हनीमून पॅकेजने आखाती देश कतारमध्ये त्यांना ड्रग्ज स्मगलिंगच्या आरोपात अटक केली. परंतु, आता या निर्दोष जोडप्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मुंबईचे निर्दोष दाम्पत्य शरीक आणि ओनिबाला वाचवण्यासाठी आणि त्यांना कतारवरून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच त्यांची काकी तबस्सुमचा शोधही सुरू आहे, जी अजूनही फरार आहे.

एनसीबीने 14 ऑक्टोबरला काही ड्रग्ज स्मगलरला पकडले होते, ज्यांच्याकडून 1.4 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, त्यांच्या चौकशीत समजले की, या जोडप्याला त्यांनी आणि त्यांची साथीदार तबस्सुमने कतारला पाठवले होते.

तबस्सुम आणि तिचा साथीदार निजाम कारा यांना मागच्या वर्षी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांना यावर्षी सप्टेंबरमध्ये जामीनावर सोडण्यात आले होते.

तर मागच्या वर्षी 27 सप्टेंबरला, ओनिबाचे वडील शकील अहमद कुरैशी यांनी एनसीबीला पत्र लिहून दोघांच्या सुटकेसाठी मदत मागितली होती. जेलमध्येच ओनिबाने मुलीला जन्म दिला आहे.