Kolhapur : नैराश्यातून दाम्पत्याची मुलासह नदीपात्रात आत्महत्या

पन्हाळा : पोलीसनामा ऑनलाइन –   जीवनात अयशस्वी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून दाम्पत्याने आपल्या मुलासह नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात उघडकीस आली आहे. या सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. दाम्पत्याने आपल्या 13 वर्षाच्या मुलासह आत्महत्या केली. जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी घरात सापडली आहे.

दिपक शंकर पाटील (वय-40), वैशाली दिपक पाटील (वय-35), विघ्नेश दिपक पाटील (वय-13) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह गोठे येतील कुंभी नदीपात्रात सापडले. आई आणि वडिलांनी आपल्या 13 वर्षाच्या मुलाला घेऊन नदी पात्रात उडी मारुन ही आत्महत्या केल्याचे सकाळी उडकीस आली. हे दाम्पत्य गुरुवारी रात्री 11 नंतर घराबाहेर पडले होते.

पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील पाटील हे दाम्पत्य दोन मुले, वडील असे पाचजण एकत्र राहत होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पाटील दाम्पत्याने कुंभी नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली. नदी पात्राजवळ तिघांनी एकत्र दोरीने बांधुन घेतले. सकाळी त्यांच्या घराला बाहेरून कडी अल्याचे दिसून आल्यानंतर शेजाऱ्यांनी घर उघडले. त्यावेळी त्यांना मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता कुंभी नदीपात्राजवळ त्यांच्या चपला सापडल्या. गावकऱ्यांनी त्यांचा नदीपात्रात शोध घेतला असता तिघांचे एकत्र दोरीने बांधलेले मृतदेह आढळून आले.

गावकऱ्यांनी पाटील दाम्पत्याचा नदीपात्रात शोध घेऊन सकाळी नऊच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढले. पाटील दाम्पत्याची दहावीत शिकणारी मुलगी साक्षी (वय-16) ही आपल्या आजोळी करवीर तालुक्यातील चिंचवडे येथे गेली होती. त्यामुळे ती या घटनेतून बचावली असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.

काय लिहिलं चिठ्ठीत ?

जीवनात अयशस्वी ठरलो, आम्हाला माफ करा, कोणलाही जबाबदार धरु नये. प्रदीप घराकडे लक्ष ठेव. संजु, आक्का, अमर, आण्णाला सांभाळा कोणीही तक्रार करु नये, मी, वैशाली व विघ्नेश स्वखुशीने आत्महत्या करत आहोत. सर्ज्यादा व दिपक माफ करा, चुकलो. असा मजकूर चिठ्ठीत लिहिण्यात आला आहे.