Coronavirus : हनिमूनवरून परतल्यानंतर पतीला सोडून निघून गेली पत्नी, ‘कोरोना’ची लागण झाल्याची शक्यता

आग्रा : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातच दहशतीचे वातावरण पसरले आहे. याची प्रचिती आग्रा येथे आली. पतीसह इटलीवरून हनिमूनहून बंगळुरुला परतलेली एक महिला, पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्याला सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. संबंधित महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होताच महिलेला पतीपासून आणि सर्वांपासून दूर ठेवण्यात आले होते.
पती आणि सर्वसामान्य नागरिकांपासून दूर ठेवण्यात आलेल्या महिलेने स्वत:चा आणि हजारो लोकांचा जीव धोक्यात घालून रुग्णालयातील विलगीकरण कक्षातून पळून गेली. एवढेच नाही तर ती विमानाने दिल्ली आणि नंतर ट्रेनने थेट आग्रा येथील आपल्या माहेरी गेली. हा सर्व प्रकार समजल्यानंतर आरोग्य विभागाच्या भूवया उचावल्या असून संबंधित महिलेचा ट्रॅव्हल रुटही ट्रेस केला जात आहे.

वेगळे होण्यास नकार

महिलेच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने महिलेला वेगळे करण्यात आले होते. मात्र, ही महिला 8 मार्चला बंगळुरूहून दिल्ली आणि नंतर आग्रा येथील आपल्या माहेरी परतली. त्यानंतर जेव्हा आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्या घरी गेले त्यावेळी ती 8 सदस्यांसोबत रहात असल्याचे आढळून आले. यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वांना वेगळे राहण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिसांना बोलावून घेत या सर्वांना वेगळे करण्यात आले.

वडिलांनी खोटी माहिती दिली
आग्रा येथील सीएमओ मुकेश कुमार वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य अधिकाऱ्यांचे एक पथक संबंधित महिलेच्या घरी गेले त्यावेळी तिच्या वडिलांनी ती बंगळुरूला परत गेल्याची खोटी माहिती पथकाला दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेपानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला वेगळे करून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ही महिला एसएन वैद्यकिय महाविद्यालयाच्या विलगिकरण कक्षात आहे.

पतीला कोरोनाची लागण झालेली असतानाही गेली माहेरी
महिलेचा विवाह फेब्रुवारी महिन्यात झाला होता. यानंतर ही महिला आणि तिचा पती हनिमूनसाठी इटलीला गेले होते. तेथून ते ग्रीस आणि फ्रान्सलाही गेले होते. यानंतर ते 27 फेब्रुवारीला मुंबईत आले. तेथून ते बंगळुरूला गेले. 7 मार्चरोजी महिलेच्या पतीला कोरोना झाल्याचे आढळून आले. यानंतर दोघांना वेगळे ठेवण्यात आले होते. पतीला कोरोना झाला आहे हे माहित असताना देखील महिला वडिलांच्या बोलवण्यावरून माहेरी गेली.

तपासणीसाठी महिलेचे सॅम्पल्स पुण्याच्या लॅबमध्ये
ही महिला 8 मार्चला विमानाने बंगळुरूहून नवी दिल्लीला आणि नंतर मेट्रोने दिल्लीहून आग्रा येथे पोहचली. आता तिच्या प्रवासाचे तपशील शोधले जात असून या प्रवासात तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महिलेचे सॅम्पल्स पुण्याच्या लॅबमध्ये पठवण्यात आले असल्याची माहिती एका डॉक्टरने दिली आहे.