मुक बधीर दाम्पत्याच्या बाळाची 90 हजारांना ‘विक्री’ !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन  – भिवंडीत एका मुक बधीर दाम्पत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाचे शेजारी राहणाऱ्या महिलेने अपहरण करुन त्याची ९० हजार रुपयांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आईवडिल मुक बधीर असल्याने एकूणच त्यांच्याकडून माहिती घेणे व तपास करण्यात पोलिसांना आपले सर्व कसब पणाला लावावे लागले होते. शेजारी राहणाऱ्या तौफिक आणि फरिदा यांनीच बाळाचे अपहरण करुन त्याला घोडबंदरमधील डोंगरीपाडा येथील एका दाम्पत्याला दत्तक दिले. त्यासाठी त्यांच्याकडून ९० हजार रुपये घेतले होते. या दाम्पत्याला आपल्याला दत्तक दिले असल्याचे दाखविण्यात आलेली कागदपत्रे ही बोगस असून बाळाचे अपहरण केल्याची कल्पना नव्हती.

याबाबतची माहिती अशी, भिवंडी येथील फातमानगर भागात एक मूक बधीर दाम्पत्य त्यांचा ३ वर्षाचा मुलगा आणि सहा महिन्यांच्या मुलासह राहतात. रविवारी सकाळी त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलाला घरातून पळवून नेल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आले. याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांना मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. मात्र, आईवडिली मूक बधीर असल्याने बाळाविषयी अधिक माहिती मिळविण्यात अडचणी येत होत्या. तेव्हा त्यांनी तज्ञांच्या मदतीने या दाम्पत्याकडे चौकशी केल्यावर त्यांना शेजारी राहणारा तौफिक हा ११ डिसेंबरला बाळाच्या आई वडिलांना ठाण्यातील कोर्टनाका येथे घेऊन आला होता.

याची माहिती मिळाली़ तेथे तौफिकने काही कागदपत्रांवर त्यांचे अंगठ्याचे ठसे घेतल्याची माहिती मिळाली. अनेकदा तौफिक बाळाला घेऊन त्याच्या घरी जात असे, असे या आईवडिलांनी तज्ञांच्या मदतीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घरी पाहिल्यावर तौफिक व फरिदा हे दिसून आले नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी ठाण्यातील कोर्टनाका येथे आपला मोर्चा वळविला. ज्या दुकानात तौफिक बाळाच्या आईवडिलांना घेऊन गेला होता. तेथील दुकानातील संगणकात असलेली कागदपत्रे तपासल्यावर त्यांनी घोडबंदर येथील डोंगरीपाडा भागातील एका कुटुंबाला त्यांचे बाळ दत्तक दिल्याची कागदपत्रे आढळून आली. कागदपत्रावरील मोबाईल क्रमाकांवरुन पोलिसांनी घराचा पत्ता शोधला. तेव्हा त्यांच्या घरात बाळ सुखरुप असल्याचे आढळून आले.

या कुटुंबियांना या बाळाचे अपहरण करुन आपल्याला दत्तक दिले असल्याची माहिती नव्हती. या बाळाच्या बदल्यात तौफिक आणि त्याची आई फरिदा यांनी ९० हजार रुपये घेतल्याचे या कुटुंबियांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी फरिदा हिला ताब्यात घेतले असून तौफिकचा पोलीस शोध घेत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/