Coronavirus : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी राज्य सरकारनं अधिक धाडस दाखवावे : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या  फैलावामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. तसेच लॉकडाउन असल्यामुळे राज्यातील आणि विशेषत: मुंबईतील स्थिती चिंताजनक असून, अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उपाययोजनांसाठी धाडसी निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या कसोटीच्या काळात आमचे पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

लॉकडाउनमध्ये उद्योगांना दिलासा देण्यासाठी व अर्थचक्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक वित्तीय निर्णयांचा उल्लेख फडणवीस यांनी केला.  ‘रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेत रोखतेचे प्रमाण वाढवून ते 1.6 टक्क्यांवरून 3.2 टक्के इतके केले. रेपो दर, रिव्हर्स रेपोदरात गरजेनुरूप बदल केले. पायाभूत सुविधा क्षेत्र, बांधकाम, हिरे व्यवसाय क्षेत्रांमध्ये टाळेबंदी व सामाजिक अंतराचे निकष पाळून काम सुरू ठेवता येईल. कोरोनाचे संकट कधी जाईल, हे निश्चित सांगता येणार नसले, तरी त्या परिस्थितीत काम कसे सुरू ठेवता येईल, यासाठी राज्याला धाडसी निर्णय घ्यावेच लागतील. राज्य सरकार काही कोरोना प्रतिबंधात्मक बाबी योग्य प्रकारे हाताळत नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

वरळी, धारावी अशा काही विभागांमधे फैलाव होत असताना लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या चाचण्या न करण्याचा निर्णय आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत आहे. चाचण्या न केल्याने आकडा कमी दिसेल, मात्र फैलाव वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने मोठया प्रमाणावर धान्यसाठा उपलब्ध करून देऊनही सुमारे तीन कोटी नागरिकांना, मजुरांना ते पुरविण्यात विलंब झाला. केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली, मात्रा राज्यात बैठक झाली नाही. शिवसेना-भाजपमध्ये ‘एकमेकांबद्दल विश्वासाचे वातावरण राहिले नाही. भाजपच्या जास्त जागा आल्यास शिवसेनेला सरकारमध्ये स्थान किंवा महत्त्व राहणार नाही, असा ग्रह करून देण्यात आल्याने भाजपच्या जागा 15-20 जागा पाडण्यात आल्या. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा आधीपासूनच छुपा समझोता झाला होता.’ अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द शिवसेनेला दिला नव्हता. लोकसभेत युती केल्यावर विधानसभेत न केल्यास ते योग्य होणार नाही, असे पक्षातील सर्वोच्च नेत्यांचे मत असल्याने बहुमत मिळण्याची खात्री असूनही युती केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.