पुणे पोलिसांना न्यायालयाची चपराक, तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर : विशेष न्यायालय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आनंद तेलतुंबडे यांना अटक केल्याप्रकरणी न्यायालयाने पुणे पोलिसांना चपराक दिली आहे. आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे अटकेपासूनचे संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुरुवारी न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन शुक्रवारी फेटाळल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी शनिवारी भल्या पहाटे त्यांना मुंबईतून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले होते. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आदेश दिला आहे.

आनंद तेलतुंबडे यांना ४ आठवड्यांचे अटकेपासूनचे संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यांना १४ जानेवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत हे संरक्षण देण्यात आलेले आहे. तरीही पोलिसांनी ४ आठवडे संपण्याआधीच अटक केली. देशात आतापर्यंत असा कोणताही कायदा नाही जो सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे. जर संरक्षणासाठी कालावधी दिला असेल तर त्यानंतर कारवाई करायला हवी. असा युक्तीवाद एड. रोहन नहार यांनी केला.

तर तेलतुंबडे यांना संरक्षण दुसऱ्या न्यायालयात जामीन मिळण्यासाठी दिले होते. एकदा अंतरिम जामीन फेटाळला गेल्यावर अटक करता येते. ४ आठवड्यांचा वेळ जामीनासाठी दिला होता. परंतु जामीन नाकारला असेल तर दिलेल्या कालावधीत तुम्ही जामीनासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे जामीन फेटाळल्यानंतर अटक करू शकत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांचा जामीन उच्च न्यायालय फेटाळेल असे सर्वोच्च न्यायालयालाही माहित नव्हते. तसेच तुम्हाला जामीनासाठी जायचे असेल तर तसा अर्ज न्यायालयात द्यावा लागेल. असा युक्तिवाद सरकारी वकील एड. उज्ज्वला पवार यांनी केला. दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आता न्यायालयाने त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत.