3 वर्षांपासून स्वत:ला ‘जिवंत’ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेय ‘ही’ महिला, कोर्टानं ‘मृत’ म्हणून केलं होतं घोषित, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच पंकज त्रिपाठी यांचा ‘कागज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये दाखवण्यात आले आहे की एक माणूस कशा प्रकारे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की तो जिवंत आहे. ही केवळ एका चित्रपटाची कथा नाही, वास्तविक जीवनातही असे बरेच लोक आहेत ज्यांना या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. हा चित्रपटही खऱ्या घटनांवर आधारित आहे. अशीच एक घटना फ्रान्समध्येही पाहायला मिळाली आहे.

58 वर्षांची एक महिला 3 वर्षांपासून हे सिद्ध करण्यासाठी झटत आहे की ती जिवंत आहे. कोर्टाने एका खटल्या दरम्यान तिला मृत घोषित केले होते. या महिलेचे नाव जीन पोचेन असे आहे.वास्तविक जीन ची एक क्लिनिंग कंपनी होती. वर्ष 2000 मध्ये नुकसानीच्या कारणामुळं जीनला तिच्या क्लिनिंग कंपनीमधून बऱ्याच कर्मचाऱ्यांना काढावे लागले. त्यानंतर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. वर्ष 2004 मध्ये कोर्टाने जीनच्या कंपनीला आदेश दिले की नोकरीवरून काढून टाकलेल्या कर्मचार्‍याला नुकसान भरपाई म्हणून 14 हजार युरो देण्यात यावे. परंतु हा आदेश पारित करण्यात आला नाही कारण तो कंपनीच्या नावे होता, जीनच्या नाही. त्यानंतर, कर्मचार्‍याने जीनकडे पैशाची मागणी केली आणि आणखी एक गुन्हा दाखल केला. या वेळी कोर्टाने आदेश दिला की जीन आता या जगात नाही, त्यामुळे तिच्या पती आणि मुलाला नुकसान भरपाई म्हणून त्या कर्मचार्‍याला पैसे देण्यास सांगितले.

जीन मरण पावली आहे, यावर कोर्टाने विश्वास का ठेवला?
कोर्टाने जीनच्या माजी कर्मचार्‍याचे ऐकून यास सहमती दर्शविली की जीनचा मृत्यू झाला आहे. असे यामुळे झाले कारण जीन कोर्टाच्या आदेशाला प्रतिसाद देत नव्हती आणि तिने कर्मचार्‍याच्या लेटरला देखील उत्तर दिले नव्हते. हे पुरावे कोर्टासाठी पुरेसे होते. त्यांनी जीनला मृत घोषित केले. ती जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी जीन अनेक न्यायालयांमध्ये हजर झाली आहे. तिच्या या कायदेशीर लढाईमुळे आता तिला मृत तर मानले जात नाही परंतु ती जिवंत आहे असेही मानले जात नाही. जीन सांगते की तिला कुठेही जाण्याची भीती वाटते कारण तिला असे वाटते की जर ती बाहेर गेली आणि तिच्याबरोबर असे काही घडले, ज्यात तिला कोण आहे हे सिद्ध करावे लागले तर ती वाईटरित्या अडकेल. कोर्टाने मृत घोषित केल्यानंतर जीनचे ओळखपत्र, लायसन्स वगैरे सर्व कागदपत्र खारीज केले गेले होते.