झाकीर नाईकला न्यायालयाचा ‘दणका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ३१ जुलैपूर्वी कोर्टात प्रत्यक्ष हजर रहा, अन्यथा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईक याला दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईकविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात यावे यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. ईडीने नाईकवर १९३ कोटी रुपयांची बेहिशोबी रक्‍कम जमा केल्‍याचा आरोप लावला आहे. बेहिशेबी मालमत्‍ता आणि भडकावू भाषण देण्याच्या आरोपात नाईक वाँटेड आहे.

दहशतवादी कारवाईसाठी पैसे दिल्याचा तसेच प्रक्षोभक भाषण देऊन दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आणि २०१६ साली ढाका येथे झालेल्या दंगलीला कारणीभूत सल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. १ जुलै २०१६ रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या त्या हल्ल्यात तब्बल २० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तेव्हापासून तो फरार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यावर आरोपही लावले होते.

झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये वास्तव्याला आहे. मलेशिया सरकारने झाकीर नाईकला भारताच्या हवाली करावे अशी मागणी भारत सरकारने मलेशियाकडे केली होती. मात्र ही मागणी मलेशियाने फेटाळून लावली. गेल्या महिन्यात त्याने भारतात परतण्यासाठी तयारी दर्शवली होती. आपण दोषी ठरत नाही तोवर आपल्याला अटक केली जाणार नसल्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले तरच आपण भारतात परतण्यास तयार आहोत अशी अट त्याने घातली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बांगलादेश आणि श्रीलंका सरकारने नाईक यांच्या ‘पीस टिव्ही’ च्या प्रसारणावर बंदी घातली होती.