येवलेवाडी विकास आराखडा प्रकरण : न्यायालयाने नगरसेवक मोरे यांना दिला ‘हा’ आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आमदार योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी येवलेवाडी विकास आराखडा बाबत वक्तव्य केले होते. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून त्यांची बदनामी झाली होती. याबाबत न्यायालयाने आमदार टिळेकर यांना दिलासा दिला असून वसंत मोरे यांना याबाबत वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत.

येवलेवाडीच्या विकास आराखड्यात आरक्षण बदलासाठी आमदार टिळेकर यांनी एका बिल्डरकडून आलिशान गाडी घेतल्याचा आरोप मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केला होता.या प्रकरणी आमदार योगेश टिळेकर यांनी पुणे दिवाणी न्यायालयात वसंत मोरे यांच्या विरुद्ध १० कोटी रुपयांचा आब्रुनुकसानीचा व मानहाणीचा दावा दाखल केला होता.

वसंत मोरे यांनी केलेले वक्तव्य हे कुठलीही सत्यता पडताळून न पाहता केवळ राजकीय स्टंट म्हणून कुठल्याही कागदपत्राविना  केले होते. येवलेवाडी विकास आराखडा समितीमध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर यांची नेमणूक पुणे महानगरापिलेका मुख्य सभेत केलेली होती. या नेमणुकीमध्ये व येवलेवाडी विकास आराखड्यातबाबत आमदार टिळेकर यांचा कोणताही संबंध नाही. या प्रकरणात टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर यांचा आरक्षण बदलाचा कुठलाही संबंध असल्याचा एकही पुरावा नगरसेवक वसंत मोरे यांनी न्यायालयात दाखल केलेला नाही.

या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत नगरसेवक वसंत मोरे किंवा त्यांच्यावतीने इतर कोणत्याही व्यक्तीने येवलेवाडी विकास आराखडा व अलिशान गाडी संदर्भात आमदार टिळेकर यांच्या बदनामी बाबत कोणतेही निवेदन, अथवा वक्तव्य कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसिद्ध करुन नये असा मनाईचा आदेश न्यायालयाने दिला आहे.