निलंबित पोलिस निरीक्षक सुनिल माने यांना गुंडांकडून धोका?; जेलमध्ये मिळणार संरक्षण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक सुनील माने हे सध्या अटकेत आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, त्यांच्या जीवास धोका असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी दावा केल्यानंतर कारागृहात सुरक्षा पुरवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.

सुनील माने हे पोलिस सेवेत असल्याने त्यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात आहे. त्यांनी सेवेत असताना अनेक गुंडांवर कारवाई केली आहे. त्यामुळे कारागृहात गेल्यावर गुंडांकडून त्यांना धोका असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यानुसार, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर सुनील माने यांना कोठडीमध्ये संरक्षण द्यावे, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणात सुनील माने यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली. 4 मार्च रोजी रात्री एका व्यक्तीने फोन केला. यावेळी आपण कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे बोलतोय, असे हिरेन यांना सांगण्यात आले. तसेच त्यांना घोडबंदर रोड येथे बोलावण्यात आले होते. तेथे हिरेन यांची हत्या करण्यात आली, असा एनआयएला संशय आहे. याप्रकरणात सुनील माने यांना अटक केली आहे.