न्यायालयाचा दणका ! उपाधीक्षक आणि उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट नोटा तब्बल चोवीस दिवस स्वतःकडे ठेवून ६ लाख ६४ हजार रुपयांचा गैरवापर केल्याप्रकरणात सहकारनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक तसेच सध्याचे उपाधीक्षक शशिकांत शिंदे आणि पोलिस उपनिरीक्षक अमोल टेकाळे यांच्याविरुद्ध फौजदारी, दिवाणी आणि खात्यांतर्गत चौकशी करावी असा आदेश न्यायालाने दिला आहे. तसेच सरकारी वकील राजेश कावेडिया यांना संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून तसा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कर्‍हाळे यांनी हा आदेश दिला आहे.

याप्रकऱणी तपासातील त्रुटीमुळे न्यायालयाने मुकनाराम मुळारामजी पटेल (वय. २४, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड मूळ रा. राजस्थान) यांची मुक्तता केली आहे.

३० डिसेंबर २०१४ रोजी सहकारनगर येथील एसएसबीजे बँकेच्या शाखेत 6 लाख 80 हजार रुपये भरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन व्यवस्थापकांनी ३१ नोटा बनावट नोटा जमा केल्या. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक अमोल टेकाळे आणि पोलिस निरीक्षक शशिकांत शिंदे यांच्या ताब्यात या नोटा देण्यात आल्या. नंतर उरलेली ६ लाख ६४ हजार ५०० रुपयांची रोकड टेकाळे यांनी जप्त केली. मात्र त्याच दिवशी पोलिसांनी पंचनामा केला नाही. किंवा गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी २४ दिवसांनी म्हणजेच २४ जानेवारी २०१५ रोजी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद झाला. त्यावेळी न्यायालयाने यावर निरीक्षण नोंदविले.

तत्कालीन पोलीस निरीक्षक शिंदे आणि उपनिरीक्षक टेकाळे यांची भूमिका संशयास्पद

न्यायालयाने म्हटले की, टेकाळे यांनी बनावट नोटा जमा करून घेतल्यानंतर बँकेतील उर्वरित रक्कम ६ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त केली. मात्र पंचनामा केला नाही. ही रक्कम पटेल किंवा बँकेला परत करण्यात आली नाही. टेकाळे आणि शिंदे यांनी गुन्हा न नोंदविता कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळे टेकाळे आणि पोलिस निरीक्षक शिंदे यांची भूमिका संशंयास्पद वाटत आहे. तसेच रकमेचा गैरवापर करून आरोपी व्यक्तीलाच मदत केल्याचे दिसते आहे. असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा पोलिस खात्याच्या वरिष्ठ यंत्रणेला हा निकाल पाठवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.