Aurangabad News : 1000 रुपयाची लाच घेताना कोर्टातील शिपाई अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आशीलाविरुद्धचे जेल वॉरंट पोलिसांना देण्यापासून थांबवल्यामुळे मोबदला म्हणून वकिलाकडून एक हजार रुपयाची लाच घेताना न्यायालयातील शिपायाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज (शुक्रवार) आदालत रोडवरील हॉटेल आदिती येथे करण्यात आली. राहुल अनंतराव पांचाळ (वय-32) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे.

प्रथमवर्ग न्यायालयाने तक्रारदार यांच्या अशीलाविरुद्ध जेल वॉरंट काढण्याचे आदेश दिले होते. हे वॉरंट पोलिसांना देण्यापासून थांबवल्याने बक्षीस म्हणून राहुल पांचाळ याने वकिलाकडे एक हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता राहुल पंचाळ याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अदालत रोडवरील हॉटेल आदिती येथे सापळा रचला. वकिलाकडून एक हजार रुपयाची लाच स्विकारताना राहुल पांचाळ याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रेशमा सौदागर आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपी विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.