गर्भलिंग निदान चाचणी करणार्‍या महिला डॉक्टरला ३ वर्षाची सक्‍तमजुरी

गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावल्याची ही पुण्यातील पहिलीच वेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीररित्या गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी पुण्यातील एका महिला डॉक्टरला शिवाजीनगर येथील न्यायालयाने ३ वर्ष सक्‍तमजुरी आणि १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावल्याची ही पुण्यातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. निना मथराणी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी ही शिक्षा सुनावली आहे. सन २०११ सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी याबाबत तक्रार केली होती. सोनोग्राफी करण्यासाठी डॉ. मथराणी यांनी ९ हजार रूपयाची मागणी केली होती. सोनोग्राफीला एवढे कशासाठी पैसे लागतात अशी शंका उपस्थित झाली. त्यानंतर बनावट ग्राहकाला पाठविण्यात आले. डॉ. निना मथराणी या गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांचा पर्दाफाश झाला.

दरम्यान, डॉ. मथराणी यांच्यासह डॉ. मकरंद रानडे यांच्याविरूध्द खटला चालु होता. मात्र, डॉ. रानडे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. मथराणी यांच्याविरूध्द न्यायालयात खटला चालु होता. पुणे मनपातील पॅनवरील वकिल अ‍ॅड. अनंत रणदिवे यांनी या खटल्याचे काम पाहिले तर मनपाच्या मुख्य विधी सल्‍लागार मंजुषा ईधाटे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे यांनी या खटल्यादरम्यान देखील मदत केली.