अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला शिक्षा

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन – शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला न्यायालयाने चार वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जयवंत मारुती भुरुक (वय २३  रा. किरकटवाडी, हवेली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १४  वर्षीय पीडित मुलीच्या आईने राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

 

पिडीत मुलगी ८ ऑगस्ट २०१६  रोजी शाळा सुटल्यानंतर भोरमधील इंगवली फाटा येथून पायी घरी जात होती. त्यावेळी झाडांमध्ये दबा धरून बसलेल्या जयवंत याने मुलीला पकडले. तिच्याबरोबर अश्लील चाळे केले करत तिच्या गालावर चावला होता.त्यानंतर मुलीने स्वत:चा बचाव करत असताना त्याच्या बोटाचा चावा घेतला.

तिला आरोपींनी याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तिने यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर जयवंत याने दुसऱ्या एका मुलीचा विनयभंग केला होता. न्यायालयात याप्रकरणी एकूण पाच साक्षीदार तपासले. तपास अधिकारी आणि पंचांची साक्ष महत्त्वाची ठरली, तर पीडितेच्या गालावरील चावा हा आरोपीने घेतला होता हे देखील वैद्यकीय पुराव्यातून सिध्द झाले होते.