छिंदमचा तडीपार पुनर्निरीक्षण अर्ज न्यायालयाने फेटाळला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याने तडीपारीच्या आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने छिंदम याचा अर्ज फेटाळला. याबाबत माहिती अशी की, तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी तडीपारीचा आदेश काढला होता.

या आदेशाविरुद्ध छिंदम यांने जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील ॲड. अनिल डी. सरोदे यांनी युक्तिवाद केला की, अर्जदार छिंदम हा अहमदनगर महापालिकेचा तत्कालीन उपमहापौर असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या अहमदनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत छिंदम याने उमेदवारी दाखल केली आहे.

छिंदम पुन्हा निवडणूक लढवित असल्याने तो शहरात उपस्थित राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध करण्यात आलेला तडीपारीचा आदेश योग्य आहे. छिंदम हा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा असून त्याच्याविरुद्ध जिल्ह्यात विविध स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हद्दपारीचा आदेश कायम करावा असा युक्तिवाद केला. यावेळी छिंदमच्या वतीने ॲड. एस.आर.सय्यद यांनी युक्तिवाद केला की, छिंदम विरुद्ध गुन्हे निकाली निघाले आहेत. फक्त दोन गुन्हे आहेत. छिंदम हा बाहेर गेल्यावर त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. घरात राहूनच तो सुरक्षित राहू शकतो,त्यामुळे तडीपारीचा आदेश रद्द करावा असा युक्तिवाद करण्यात आला. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून छिंदम याचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला.