आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्या विरुध्दचा ‘तो’ तक्रार अर्ज न्यायालयाने फेटाळला

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – माजलगाव येथील प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्या विरुध्द माजलगाव न्यायालयात दाखल केलेला तक्रार अर्ज माजलगावचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. वाघमारे यांनी फेटाळून लावला.

माजलगाव येथील एका तक्रारदाराने माजलगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात कथित क्लिपच्या आधारावर अर्ज दाखल केला होता. या अर्जात म्हटले होते की, आयपीएस भाग्यश्री नवटके यांनी एका समाजाला उद्देशून वादग्रस्त शब्द वापरले आहेत. त्यामुळे या समाजाच्या भावना दुखावल्याचा आक्षेप घेऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करा, त्यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशी मागणी करण्यात आली होती. या अर्जावरील सुनावनी 20 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. त्यात न्यायालयाने हा तक्रार अर्जच फेटाळून लावला.

हेही वाचा – किरण गित्ते यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यास केंद्राचा नकार

नवटके यांची बदली

कथित व्हिडिओ क्लिपवरुन गदारोळ उठल्यानंतर गृहविभागाने आयपीएस नवटके यांना तात्पुरत्या स्वरुपात मुंबई एसआयडी विभागात हलविले होते. त्यानंतर त्यांची लगेचच सिंधुदूर्ग जिल्ह्यात कनकवली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती दिली.

न्यायसंस्थेवरील विश्वास दृढ झाला – होके पाटील

माजलगाव येथील न्यायालयाने नवटके यांच्या विरुध्दचा तक्रार अर्ज फेटाळल्यानंतर माजलगावातील सर्वधर्मीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नवटके या प्रामाणिक अधिकारी म्हणून सर्व परिचित होत्या. त्यांनी अवैध धंद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेने अनेकांचे धाबे दणाणले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात गुंडांचे कंबरडे मोडले होते. छेडछाडीला 100 टक्के आळा घातला होता, सावकारकी मोडीत काढली होती. अनाधिकृत वाळू, दारु, गुटखा, मटका पुर्णपणे बंद केला होता. असे असतानाही त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले होते. आज न्यायालयाने एका इसमाचा तक्रार अर्ज फेटाळल्यामुळे माजलगावातील सामान्य जनतेचा न्यायालयावरील विश्वास दृढ झाला आहे, अशी प्रतिक्रीया सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र होके यांनी दिली.