वरावरा राव यांना अंतरिम जामीन नाहीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एल्गार परिषद आणि माओवादी कनेक्शनवरून सध्या अटकेत असलेले वरावरा राव यांचा तात्पुरता जामीन अर्ज न्यायायलयाने आज फेटाळला. राव यांच्या भावाच्या पत्नीचे निधन झाल्याने धार्मिक विधीसाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्याचा अर्ज त्यांनी केला होता.

वरावरा राव हे बंदी घालण्याता आलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेचे वरिष्ठ व सक्रीय नेते आहेत. त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केल्यास ते भुमीगत होण्याची शक्यता आहे. ते सध्या एका अतिशय गंभीर व देशविरोधी गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता जामीन असा लेखी युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात दाखल केला होता. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

धार्मिक विधीसाठी नातेवाईक, मित्र परिवार तसेच तेथील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. दरम्यान वरावरा राव यांच्या संरक्षणासाठी बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या पोलिसांना तेथील सर्वच व्यक्ती अपरिचित आहेत. त्याचवेळी नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राव यांना पळून जाण्यास मदत नक्षलवादी करु शकतात. याची शक्यता नाकारता येत नाही. राव हे भूमिगत झाल्यास पुन्हा सापडणार नाहीत, असे सरकारी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने राव यांचा जामीन फेटाळला.