तत्कालीन पोलिस अधीक्षक (SP) मीनांना न्यायालयाचा दिलासा

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन – प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी यांच्या न्यायालयात तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना व त्यांचे अंगरक्षक यांच्या विरोधात याचिका केली होती. यात त्यांना मुक्त करण्यात आले होते. या आदेशाच्या विरोधात याचिकाकर्ता जफरअली खान पठाण यांनी फौजदारी अपिल केले होते. परंतु सुनावणी दरम्यान याचिकाकत्र्या हजर न राहिल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहेरे यांनी न्यायालयीन कामकाजाचा वेळ वाया घातल्याबद्दल याचिकाकर्त्यांना तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम जिल्हा वकील संघात भरण्याचे आदेश दिले आहेत.

२०१७ मध्ये बिदर येथून येणाऱ्या चौकीमध्ये पोलिस आणि चौकीतील युवकांची धक्काबुक्की व बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. यात सिडको ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात जयदीपसिंग शाहू याला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयात त्याने आपल्याला पोलिस अधीक्षक व त्यांच्या अंगरक्षकाने मारहाण केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयात फौजदारी खटला क्रमांक ३४/२०१८ दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणाची याचिका दाखल करुन घेतली. त्यानंतर शाहूने ही याचिका मागे घेतली. मात्र, सामाजिक कार्यकर्ता जफरअली खान पठाण यांनी याच प्रकरणी एक पुनर्याचिका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली होती. मात्र या याचिकेच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता गैरहजर राहिल्याने ही याचिका निकाली काढण्यात आली.

न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांला आर्थिक दंड सुनावताना न्यायालयाचा बहूमुल्य वेळ वाया घालवल्याचा ठपकाही ठेवला. पठाण यांनी ही तीन हजार रुपये दंडाची रक्कम एक महिन्यात वकील संघाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात मीना यांच्या वतीने ॲड. एस. एन. हाके यांनी काम पाहिले.