Latur : घुसखोरी केलेल्या 2 बांगलादेशींना कारावास, लातूरच्या महिलेशी होते संपर्कात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – बांगला देशातून घुसखोरी करून भारतात आलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे दोन बांगलादेशी नागरीक लातूर तालुक्यातील कोळपा येथील एका महिलेशी व्हाट्सॲपवरून संपर्कात आले होते. त्यांनी तिच्यासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने भारतात घुसखोरी केली होती. मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी या दोघांना दोन वर्षे तीन महिने कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उमेश कदम यांना 7 जुलै 2018 रोजी कोळपा येथे दोन बांगलादेशी नागरिक आल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने कोळपा येथे जाऊन छापा टाकला. या कारवाईत कबीर रजाउल उर्फ शहाबुल्ला (वय-26) व मोहम्मद मुरनावत हुसेन दिनार (वय -22 रा. फेनी दि.चतुग्राम, बांगलादेश) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांच्याकडे भारतात येण्यासाठी लागणारी कोणतीच कागदपत्रे नसल्याचे दिसून आले.

पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पारपत्र नियम 1950, सहकलम 3(1) परकीय नागरिक आदेश 1948, सह कलम 14ए (6) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोघेही अधिकृतरित्या भारतात घुसखोरी करुन आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मुख्य न्याय दंडाधिकारी के. एम. कांयगुडे यांनी या दोघांना दोन वर्षे तीन महिने कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

कोळपा येथील एका महिलेशी हे दोघे व्हॉट्सअॅपवर संपर्कात आले होते. त्यानंतर या महिलेशी लग्न करण्याच्या उद्देशाने त्यांनी बांगला देशातून भारतात घुसखोरी केली होती. तसेच त्यांच्याकडे बांगलादेशी चलनही आढळले होते. यात पोलिसांकडून त्यांच्याकडून विविध आधारकार्ड, पॅनकार्ड, कागदपत्रे, मोबाईल जप्त केले होते. या प्रकरणात एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले. पुराव्यावरुन त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले होते. न्यायालयाने कोर्ट साक्षीदार म्हणून एक साक्षीदार तपासला. यानंतर या दोघांना शिक्षा ठोठावली.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तरोणे यांनी केला होता. न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास डाबेरा, महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता इटुबोने, पोलीस शिपाई राजेश कंचे, सुहास जाधव, वाजीद चिखेल यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणी अभीयोग पक्षाचे कामकाज सहाय्यक सरकारी अभियोक्ता जे.यू.पवार यांनी पाहिले.