न्यायालयाने परवानगी दिल्यास सभा घेणार : चंद्रशेखर आझाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : चंद्रशेखर आझाद यांना पुण्यात येण्यास रोखणार नाही मात्र त्यांना पुण्यात सभा घेता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चंद्रशेखर आझाद हे आज पुण्यात आले असता त्यांनी न्यायालयाने परवानगी दिल्यास सभा घेणार अन्यथा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. अगर न्यायालयाने सभेला परवानगी नाकारली तर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शक्य झाल्यास पुण्यातून कोरेगाव भीमापर्यंत पायी जाणार असल्याचेही चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले.

मागिल वर्षी ज्यांनी दंगली पसरवल्या ते लोक या वर्षीदेखील दंगली पसरवू शकतात. पोलीस त्यांच्यावर कारवाई का करित नाही असा सवाल देखील चंद्रशेखर यांनी उपस्थित केला. पोलिसांकडून वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. दलीत लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. जेणे करुन कोरेगाव येथे नागरिकांनी येऊ नये.

मागील वर्षीच्या दंगली दरम्यान पोलिसांना एक पत्र मिळाले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवाला धोका असल्याचे त्या पत्रात म्हटले होते. मात्र हा एक राजकीय स्टंट आहे. दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेले निर्दोष आहेत. त्यांना मुद्दाम अटक करण्यात आली आहे. धोका पंतप्रधानांना नाही तर या ठिकाणच्या माणसाला आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने जात आहोत. मात्र, सरकार वातावरण दुषीत करीत आहे. हे सरकार दंगली पसरवून राजकारण करीत आहे. परंतु आता असे होणार नाही असेही चंद्रशेखर यांनी सांगितले.