पुण्यात वाढत्या ‘कोरोना’मुळे उपमुख्यमंत्री घेणार मोठा निर्णय ? बोलावली तातडीची बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यानुसार, काही निर्बंध लावण्याचा विचार केला जात आहे. असे असताना पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाबाबत आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्याचे अधिकार यापूर्वीच अजित पवार यांनी दिले आहेत. याबाबत पवार म्हणाले, ‘कोविड परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आम्ही त्यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्णय घेणार आहोत. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या बरे होणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक आहे’.

1 फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत वाढ

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र, 1 फेब्रुवारीपासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

नियमावली न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई

सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत सार्वजनिक हालचालींवर बंधने आणली जाऊ शकतील. तसेच कोरोनासंबंधी घालून दिलेल्या नियमांसह सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.